Mozambique boat accident latest news : मध्य आफ्रिकेतील मोझांबिकमधील बैरा बंदराजवळ शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) एक भयावह दुर्घटना घडली. येथे लाँच बोट उलटून १४ भारतीय नागरिकांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच अद्याप बेपत्ता आहेत. ही दुर्घटना एका टँकरमधील कर्मचाऱ्यांच्या नियमित बदलीदरम्यान घडली. ही बोट किनाऱ्यावर नांगरलेल्या टँकरकडे जात असताना अचानक उलटली. भारतीय उच्चायुक्तालयाने या घटनेची पुष्टी करताना एक्सवर पोस्टद्वारे माहिती दिली असून, शोध व बचाव मोहिमा सुरू असल्याचे सांगितले आहे.
रिपोर्ट्सनुसार, ही बोट दुर्घटना बैरा बंदराच्या बाह्य भागात घडली, जिथे टँकरच्या कर्मचाऱ्यांना बदलीसाठी नेलं जात होतं. बोट कशामुळे उलटली याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण स्थानिक अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. या बोटीवर एकूण १४ भारतीय नागरिक होते. यातील पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे आणि ते सुरक्षित आहेत. यापैकी एका भारतीयावर बैरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारतीय उच्चायुक्तालयाने एक्सवर शोक व्यक्त करताना म्हटलंय, “बैरा बंदराजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत तीन भारतीय नागरिकांसह झालेल्या जीवितहानीबद्दल आम्ही हृदयापासून शोक व्यक्त करतो. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्यांना सर्वतोपरी मदत करत आहोत.” उच्चायुक्तालयाने बेपत्ता झालेल्या पाच भारतीयांच्या शोधासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी आणि सागरी संस्थांशी समन्वय साधला असून, शोध मोहिमा सुरू आहेत. अद्याप कोणत्याही नवीन अपडेट्समध्ये बेपत्ता व्यक्तींचा शोध लागल्याची माहिती नाही.


