नवी दिल्ली : गत पाच वर्षांत विदेशातून १३४ फरार गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्यात यश आले, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) दिली आहे. आंतरराष्ट्रीय पोलीस अर्थात इंटरपोलबरोबरच राज्य व केंद्रीय तपास संस्थांमधील समन्वयामुळे मोठ्या प्रमाणात प्रत्यार्पण शक्य झाल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सीबीआयला वर्ष २०२० पासून विविध देशांतून १३४ फरार गुन्हेगारांना भारतात आणण्यात यश आले आहे. यापैकी २३ जणांना चालू वर्षात भारतात आणण्यात आले आहे. या उलट वर्ष २०१० ते २०१९ दरम्यान फक्त ७४ फरार गुन्हेगारांना परत आणण्यात यश आले होते. पण, गत काही वर्षांत प्रर्यापणाच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडून विविध देशांसोबत वाढवण्यात आलेले द्विपक्षीय संबंध, तांत्रिक प्रगती आणि इंटरपोलसोबतच्या चांगल्या समन्वयामुळे हे शक्य झाले आहे.
प्रत्यार्पणासाठी तीन टप्प्यांची प्रक्रिया असते. सुरुवातीला इंटरपोलकडून रेड नोटीस जारी करण्यात येते. त्यानंतर फरार व्यक्ती कुठे लपून बसला आहे, याचा शोध घेतला जात आहे. तिसऱ्या टप्प्यात त्याला परत आणण्यासाठी कायदेशीर आणि मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एखाद्या फरार व्यक्तीबाबत सर्व १९५ देशांना अलर्ट करण्याचे काम रेड कॉर्नर नोटिसीद्वारे केले जाते. दरम्यान, भारताने आतापर्यंत ४८ देशांसोबत प्रत्यार्पण करार केला आहे. तर अन्य १२ देशांसोबत औपचारिक प्रत्यार्पण भागीदारी केली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत नुकतीच दिली आहे


