काबुल : भारताचा शेजारील देश अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या भयावहतेने हादरला. ऑगस्ट महिन्यातील भूकंपानंतर रविवारी (ता. २) रात्री उत्तर अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ शहराजवळ ६.३ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप आला. यात किमान सात जणांचा मृत्यू झाला असून, १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्यात अडकले असून, बचावकार्यात अडचणी येत आहेत.
यूएसजीएसच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र मजार-ए-शरीफ शहरापासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर खुल्म परिसरात असून, त्याची खोली २८ किलोमीटर होती. हा धक्का इतका तीव्र होता की तो आजूबाजूच्या ताजिकिस्तान, उझ्बेकिस्तान आणि तुर्कमनिस्तानसह अफगाणिस्तानातील इतर भागांतही जाणवला.
मजार-ए-शरीफ हे उत्तर अफगाणिस्तानातील प्रमुख शहर असून, येथे सुमारे ५ लाख लोक वसाहती आहेत. या शहरातील प्रसिद्ध ‘ब्लू मॉस्क’ लाही मदरेच्या भागाला नुकसान झाले आहे.
स्थानिक आरोग्य विभागाचे प्रवक्ते सामीम जॉयंदा यांनी सांगितले की, जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून, बहुतेकांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथक अथक प्रयत्न करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोसळलेल्या इमारती, मदतकार्य करणारे स्थानिक आणि भयभीत लोक दिसत आहेत. काही भागांत संपर्क सुटल्याने मदतकार्याला अडथळा उत्पन्न झाला आहे.


