Plane Crash : अमेरिकेतील केंटकी राज्यात भीषण विमान अपघाताची घटना घडली आहे. लुईसव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेताच यूपीएस एअरलाइन्सच्या मालवाहू विमानाला आग लागली आणि काही क्षणांतच ते कोसळलं. या अपघातात किमान ४ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी आहेत.
स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:१५ वाजता ही दुर्घटना घडली. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच त्यात भीषण स्फोट झाला आणि आग भडकली. काही सेकंदांतच विमान आगीच्या गोळ्यात बदललं. परिसरात काळ्या धुराचे ढग दाटले आणि काही किलोमीटर अंतरावरूनही धूर दिसत होता.
अपघातानंतर तत्काळ बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, विमानात असलेल्या २,८०,००० गॅलन इंधनामुळे आग झपाट्याने पसरली. लुईसव्हिलचे महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांनी सांगितले की, “ही आग नियंत्रणात आणणं आव्हानात्मक ठरलं असून स्फोटांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.”
केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना संवेदना दिल्या आहेत. या घटनेनंतर विमानतळावरील अनेक उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. दरम्यान, या भीषण अपघाताचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.


