Mahendra Nagar BJP leader accused of killing farmer : मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात जमिनीच्या वादातून एका भाजप नेत्याने शेतकऱ्याची निर्घृण हत्या केली असून, त्याच्या मुलींवरही अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. फतेहगढ तहसील अंतर्गत गणेशपुरा गावात रविवारी (२६ ऑक्टोबर) रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
भाजप पदाधिकारी महेंद्र नागर याने आपल्या टोळक्यासह शेतकरी रामस्वरूप धाकड याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या थार कारखाली चिरडून मारले. यात रामस्वरूप यांच्या दोन मुलींनी वडिलांना वाचवण्यासाठी धाव घेतली, पण आरोपींनी त्यांचे कपडे फाडले आणि दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळ्या झाडल्या. याप्रकरणी पोलिसांनी महेंद्र नागरसह १४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामस्वरूप धाकड (५०) हे आपल्या पत्नी आणि कुटुंबासह शेतातून घरी परतत होते. महेंद्र नागर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह १५-१६ जणांनी त्यांना घेरले. जमिनीच्या वादातून उद्भवलेल्या या संघर्षात आरोपींनी रामस्वरूप यांना आधी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. विरोध करणाऱ्या रामस्वरूप यांना थार कारखाली चिरडून मारण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ड्रायव्हरने कार थांबवली नाही आणि रामस्वरूप यांचा मृत्यू झाला.
वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या रामस्वरूप यांच्या दोन मुलींवरही आरोपींनी अत्याचार केला. मुलींनी सांगितले की, महेंद्र नागर याने त्यांचे कपडे फाडले आणि इतर आरोपींनी त्यांना धमकावले. याशिवाय, जखमी रामस्वरूप यांना वैद्यकीय मदत मिळू नये म्हणून मृतदेहाला एक तास गावाबाहेर जाण्यास मज्जाव केला गेला. संतप्त कुटुंबाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.


