नवी दिल्ली: संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या खासदारांना आता सभागृहातील आसनावरूनच आपली हजेरी नोंदवता येईल. आतापर्यंत संसदेच्या लॉबीत हजेरीची व्यवस्था होती. परंतु एकाच वेळी अनेक खासदार आले तर हजेरी नोंदवण्यात वेळ जात होता. तसेच काही खासदार हजेरी लावून कामकाजात सहभागी न होताच निघून जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लोकसभेत खासदारांच्या आसनाजवळच हजेरी नोंदवण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ही नवी व्यवस्था लागू करण्यासाठी आग्रही होते. ही नवी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा अंगवळणी पडेपर्यंत लॉबीत रजिस्टरवर स्वाक्षरीद्वारे हजेरी नोंदवण्याची जुनी व्यवस्थादेखील काही दिवस सुरू राहणार आहे. गतवर्षी लोकसभा अध्यक्षांनी संसदेला पेपरलेस करण्याच्या प्रयत्नांतर्गत हजेरीसाठी लॉबीत एका इलेक्ट्रॉनिक टॅब्लेटवर डिजिटल पेनद्वारे स्वाक्षरी करण्याची व्यवस्था सुरू करण्याचा पर्याय सुचवला होता. खासदारांना अधिवेशन काळातील दैनंदिन भत्ता मिळवण्यासाठी हजेरी लावणे अनिवार्य असते.


