झारखंड : झारखंडची राजधानी रांची येथील हटिया धरणाजवळ शनिवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी एक भीषण अपघात घडला. चार पोलिस कर्मचारी प्रवास करत असलेली भरधाव कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट धरणात कोसळली. या अपघातात चौघांपैकी तीन पोलिसांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, चौथ्या पोलिसाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले असून, शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेने पोलिस दलात आणि स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजता चार पोलिस कर्मचारी एका खासगी कारमधून प्रवास करत होते. हटिया धरणाजवळील रस्त्यावर कार पोहोचताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव कार थेट धरणाच्या पाण्यात कोसळली आणि काही क्षणांतच पूर्णपणे बुडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रांची पोलिस, अग्निशमन दल आणि गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. धरणाच्या खोल पाण्यात कार शोधण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर केला जात आहे.
या अपघातातील तीन पोलिसांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. उपेंद्र कुमार (न्यायिक अधिकाऱ्यांचे बॉडीगार्ड), रॉबिन कुजू (न्यायिक अधिकाऱ्यांचे बॉडीगार्ड), एक सरकारी चालक (नाव अद्याप स्पष्ट नाही), चौथा पोलीस अद्याप सापडलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, त्याचा मृत्यू झाल्याची भीती आहे, परंतु शोधकार्य थांबवले जाणार नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांपैकी दोघे न्यायिक अधिकाऱ्यांचे वैयक्तिक बॉडीगार्ड होते, तर एक सरकारी वाहन चालक होता. चौथा कर्मचारीही पोलिस दलाशी संबंधित होता.


