Jag Vikram: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी तणावामुळे जागतिक सागरी मार्ग धोक्यात आले असतानाच, भारतासाठी एक अत्यंत सुखद वार्ता समोर आली आहे. तब्बल २०,४०० मेट्रिक टन एलपीजी (LPG) साठा घेऊन निघालेले भारतीय ध्वजधारक जहाज ‘जग विक्रम’ मंगळवारी (१४ एप्रिल) गुजरातच्या कांडला बंदरात सुखरूप पोहोचले आहे.
‘होर्मुझची सामुद्रधुनी’ यशस्वीरीत्या ओलांडली
जगातील अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मानला जाणारा ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) हा मार्ग ११ एप्रिल रोजी या जहाजाने यशस्वीरीत्या पार केला. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावरील २४ भारतीय खलाशी पूर्णपणे सुरक्षित असून जहाजाचे आगमन यशस्वी झाले आहे.
संघर्षाच्या काळात मार्ग काढणारे नववे जहाज
२८ फेब्रुवारीपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर, हा धोकादायक सागरी मार्ग ओलांडून भारतात येणारे ‘जग विक्रम’ हे नववे जहाज ठरले आहे. यापूर्वी ‘एमटी शिवालिक’, ‘नंदा देवी’ आणि ‘पाइन गॅस’ सारख्या ८ ते १० मोठ्या टँकर्सनी हा टप्पा पार केला आहे. मात्र, अद्यापही भारताची किमान १५ जहाजे (ज्यामध्ये कच्च्या तेलाचे आणि रसायनांचे टँकर्स आहेत) या सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडील भागात अडकलेली असल्याने चिंता कायम आहे.
ऊर्जा सुरक्षेसाठी हा मार्ग का आहे महत्त्वाचा?
- जागतिक पुरवठा: जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक एकट्या होर्मुझ सामुद्रधुनीतून होते.
- वाढती महागाई: इराण-ओमान दरम्यानच्या या मार्गावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
- भारताचा दिलासा: अशा कठीण परिस्थितीत LPG चा मोठा साठा भारतात पोहोचल्याने देशांतर्गत इंधन पुरवठ्याला मोठा आधार मिळाला आहे.


