नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. पाकिस्तानकडून राजधानी दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर आता पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये अति. जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पाकिस्तानने आज पहाटेच जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा आयुक्त राज कुमार थापा यांच्या घरावर तोफगोळा डागला. या तोफगोळ्याचा स्फोट झाल्याने राजकुमार थापा गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह दोन नागरिकही जखमी झाले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे राजकुमार थापा आणि दोन नागरिकांना मृत घोषित करण्यात आले.
राजकुमार थापा हे जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. राजकुमार थापा यांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
Devastating news from Rajouri. We have lost a dedicated officer of the J&K Administration Services. Just yesterday he was accompanying the Deputy CM around the district & attended the online meeting I chaired. Today the residence of the officer was hit by Pak shelling as they…
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025
दरम्यान जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ट्विट करत माहिती दिली आहे.आपण जम्मू-काश्मीर प्रशासन सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यात फिरत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते. आज पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य करत केलेल्या गोळीबारात अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर हल्ला झाला, ज्यामध्ये आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त श्री. राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला. या भयानक जीवितहानीबद्दल मला धक्का आणि दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो…असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.


