Nitin Nabin BJP : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर नितीन नबीन यांची निवड करण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून सुरू असलेल्या पक्षाच्या प्रक्रियेनंतर आज नामांकन आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नबीन 37 सेटसह भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेत संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नितीन नबीन यांनी पहिल्याच निर्णयात विनोद तावडे आणि आशिष शेलार यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व दिले जात आहे.
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत शोभा करंदलाजे यांची केरळसाठी सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय चंदीगड महापौर निवडणुकीची जबाबदारीही विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
बंगळूर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी राम माधव, सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची तेलंगणामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत नितीन नबीन?
दरम्यान, नितीन नबीन यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्यांचा जन्म 23 मे 1980 रोजी झाला असून ते झारखंडची राजधानी रांचीचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे आमदार होते. 2006 मध्ये वडिलांच्या निधनानंतर नितीन नबीन सक्रिय राजकारणात आले. त्याच वर्षी पोटनिवडणुकीद्वारे ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले.
2010, 2015, 2020 आणि 2025 अशा चार वेळा ते बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी रस्ते वाहतूक, नगरविकास, गृहनिर्माण तसेच विधी व न्याय अशी महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिक्कीमचे प्रभारी आणि छत्तीसगडचे सहप्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
डिसेंबर 2025 मध्ये नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली होती, तर 20 जानेवारी 2026 पासून त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा औपचारिक पदभार स्वीकारला आहे. सध्या ते बिहार सरकारमध्ये पथ निर्माण विभाग तसेच नगर विकास आणि आवास विभागाचे मंत्री असून, संघटनात्मक आणि प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्याकडे भाजपच्या नेतृत्वाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


