नवी दिल्ली : विद्यार्थ्यांमध्ये वाढणारे नैराश्य कमी करणे, त्यांना तणावमुक्त ठेवणे आणि त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आयआयटी गुवाहाटीने नवी योजना आखली आहे. यात प्रामुख्याने प्राध्यापकांसोबत सकाळी फिरायला जाणे (मॉर्निंग वॉक), अनिवार्य समुपदेशन आणि व्यापक वैद्यकीय तपासणी तसेच तणावमुक्तीसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्याचा समावेश आहे. या नव्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहील व ते आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त होतील, असा विश्वास आयआयटी गुवाहाटीने व्यक्त केला.
आयआयटी गुवाहाटीत मागील सत्रात काही विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवली. त्यानंतर, मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. अशा घटना रोखण्यासाठी आयआयटी गुवाहाटीने नव्या क्लृप्त्या असलेली योजना आखली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)-गुवाहाटीचे संचालक देवेंद्र जालिहाल यांच्या मते, संस्थेने विद्यार्थ्यांमधील आत्महत्या रोखण्यासाठी एक व्यापक योजना आखली आहे. आम्ही ‘सेंटर फॉर होलिस्टिक वेलबीइंग’च्या स्वरूपात एक समर्पित मानसिक आरोग्य आणि समुपदेशन प्रणाली स्थापित केली. विद्यार्थी स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या या केंद्राचा समुपदेशन क्लब, व्यावसायिक समुपदेशकांच्या मदतीने सहकारी विद्यार्थ्यांना त्यांच्यां मानसिक आणि एकूणच कल्याणात मदत करतो, असे त्यांनी पीटीआयला सांगितले. आम्ही निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांना वसतिगृहात विशेष व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्याचा विचार करीत आहोत. जे नियमितपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. जेणेकरून त्यांना आराम मिळेल आणि त्यांचे निरीक्षण समुपदेशकांना कळेल.
हे सर्व गोपनीय पद्धतीने केले जाईल आणि विद्यार्थ्यांना भीती वाटणार नाही किंवा त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे जालिहाल म्हणाले. विद्यार्थ्यांची चिंता व तणाव कमी करणारा आहार देण्यासाठी पोषणतज्ज्ञ नियुक्त केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नवे विद्यार्थी कॅम्पसमध्ये आले तेव्हा शिकवणी सुरू केली जाणार नाही, तर त्यांना कॅम्पसशी जुळवून घेण्याचा कार्यक्रम राबवण्यात येईल. प्राध्यापकांसोबत मॉर्निंग वॉक करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलावले जाईल. त्यामुळे दोघांचा चांगला परिचय होईल व प्रत्यक्षात वर्गात बसल्यानंतर त्यांच्यात योग्य ताळमेळ राहील, असे आयआयटी-गुवाहाटीतील विद्यार्थी कल्याण विभागाचे डीन पेरूमल अलागरसामी यांनी पीटीआयला सांगितले.


