Latur Municipal Election: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला असताना, लातूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी खेळी केली आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तब्बल 38 अपक्ष उमेदवारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
भाजप-काँग्रेसला शह देण्यासाठी नवी रणनीती
लातूर महापालिकेत एकूण 18 प्रभागांतील 70 जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने पूर्ण ताकदीने उमेदवार उतरवले असताना, शिवसेनेने (शिंदे गट) केवळ 11 जागांवर अधिकृत उमेदवार दिले होते. मात्र, आता 38 अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या निवडणुकीचे संपूर्ण चित्र पालटले आहे. आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. अपक्ष उमेदवारांच्या या ‘ग्रुप’ एन्ट्रीमुळे एकनाथ शिंदे यांनी लातूरमध्ये आपली शक्ती अनेक पटीने वाढवली आहे.
२०१७ च्या निकालाची पार्श्वभूमी
लातूरमध्ये २०१७ च्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज केला होता. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 36 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती, तर काँग्रेसला 31 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टीला खातेही उघडता आले नव्हते. मात्र, यंदा एकनाथ शिंदे यांनी अपक्षांना सोबत घेऊन महापालिकेत किंगमेकर किंवा थेट सत्तेच्या जवळ जाण्यासाठी नवी चाल खेळली आहे.


