मुंबई: येत्या २७ मार्च रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूरमधील माजी महापौर संदीप जोशी, प्रदेश सरचिटणीस आणि ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा व भटके विमुक्त प्रकोष्ठचे राज्य प्रभारी संजय केनेकर आणि माजी आमदार दादाराव केचे यांना पक्षाने संधी दिली आहे. या तिघांनाही प्रत्येकी १३ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. विधान परिषदेसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी १२ वाजता ते विधानभवनात अर्ज दाखल करतील. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रत्येकी १ जागा रिक्त झाली असून हे पक्ष इच्छुकांची भाऊगर्दी पाहून नाराजी टाळण्यासाठी उमेदवाराचे नाव जाहीर न करता थेट उमेदवारी अर्जच दाखल करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपकडून प्रवीण दटके (नागपूर मध्य), रमेश कराड (लातूर ग्रामीण), गोपीचंद पडळकर (जत) तसेच शिवसेनेकडून आमश्या पाडवी (अक्कलकुवा); राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर (पाथरी) मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्चला पोटनिवडणूक होईल. त्यासाठी सोमवार, १७ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी भाजपने आपल्या तीन जागांवरील उमेदवार जाहीर केले.
त्यासाठी नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. यासोबतच छ. संभाजीनगरमधील प्रदेश सरचिटणीस व ओबीसी विभागाचे प्रदेश प्रभारी संजय केनेकर आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे माजी आमदार दादा केचे यांना संधी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार केचे यांचे तिकीट कापून फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाने विश्वासात न घेता तिकीट कापल्याने केचे यांनी पत्रकार परिषद घेत राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर केचे यांची नाराजी पक्षाला परवडणारी नव्हती, म्हणून फडणवीस यांनी केचे यांची समजूत काढली तसेच विधान परिषदेवर संधी दिली जाईल, असा शब्द पक्षाकडून देण्यात आला. त्यानंतर केचे यांनी राजकीय संन्यास मागे घेत वानखेडे यांचा प्रचार केला. अखेर पक्षाने केचे यांना १३ महिन्यांसाठी का होईना संधी देत दिलेला शब्द पाळला आहे. भाजपच्या तिघाही उमेदवारांची मुदत १३ में २०२६ पर्यंत असणार आहे.
सिद्दीकी, चाकणकरांना विरोध, उमेश पाटलांना लॉटरी?
राष्ट्रवादीकडून विधानसभेला पराभूत झालेले झिशान सिद्दीकी, माजी खासदार आनंद परांजपे, माजी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, संजय दौंड यांची नावे चर्चेत
आहेत. मराठवाड्यातील राजेश विटेकर यांची रिक्त झालेल्या या जागेची मुदत जुलै २०३० पर्यंत आहे. विटेकर यांच्या जागेवर मराठवाड्यातील नेत्याचीच वर्षी लागावी, यासाठी मराठवाड्यातील नेते प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, सध्या ज्यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे अशा झिशान सिद्दीकी यांच्या नावाला पक्षातील एका गटाकडून विरोध होत असल्याने त्यांचे नाव मागे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ऐनवेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान स्थानिक नेत्यांमुळे पक्षाबाहेर जावे लागलेल्या व पुन्हा पक्षात आलेल्या प्रदेशचे माजी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत. महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या नावालाही पुण्यातूनच विरोध आहे. दीपक मानकर यांनी मध्यंतरी पक्ष नेतृत्वावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यासह चाकणकर यांच्या नावावर फुली मारण्यात आली आहे.
विधान परिषद बिनविरोध होणार
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी पोटनिवडणूक होत असली, तरी त्याचा कालावधी वेगवेगळा असल्याने कोटा निश्चित करण्यात आलेला नाही. भाजपकडील तीन जागांची प्रत्येकी १३ महिन्यांची मुदत असल्याने त्याचा कोटा निश्चित असला तरी विरोधकांकडे विधानसभेत आवश्यक तेवढे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधक या पोटनिवडणुकीत अर्ज भरून आपला वेळ वाया घालवणार नाहीत.


