मुंबई: राज्यातील जनतेने महायुतीला मोठे बहुमत दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे. राज्य सरकार चांगले निर्णय घेत असताना काही मंत्री नाहक वाद वाढवून घेत असून सरकारच्या चांगल्या कामगिरीवर बोळा फिरवण्याचे काम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांची कानउघाडणी केली. यापुढे तोंडाला आवर घाला, वादग्रस्त वक्तव्ये केल्यास अथवा वागल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी मंत्र्यांना दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी मंत्रालयात पार पडली. बैठक झाल्यानंतर मख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर बंद सभागृहात फडणवीस यांनी सुमारे ४५ मिनिटे मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते. एका मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला. आपले महायुतीचे सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. सरकारची प्रतिमा सांभाळणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. राज्य सरकार चांगली कामगिरी करत असताना मंत्री आणि काही आमदार बेताल वक्तव्य करत असल्याने चांगल्या कामावर पाणी फिरवण्याचे काम होत आहे.
विरोधकांना आपल्यावर नाहक टीका करण्याची संधी मिळते. त्यामुळे बोलताना विचार करून बोला. अधिवेशन काळात विरोधक सभागृहात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. पण अधिवेशनाच्या शेवटी विधानभवनात झालेल्या मारहाण प्रकरणाने जनतेत चुकीचा संदेश गेला. त्यामुळे आता तरी जबाबदारीने वागा. माध्यमांना तुम्ही रोखू शकणार नाही. काय दाखवायचे हे तुमच्या हातात नाही. पण कसे वागायचे, काय बोलायचे हे तुमच्या हातात आहे. आपल्या वागण्या-बोलण्याने विरोधकांना आणि माध्यमांना संधी देऊ नका. माध्यमांसमोर बोलताना जबाबदारीने बोला. आपल्या खात्याशिवाय इतर विषयांवर बोलू नका, खात्याच्या कामाशिवाय आवश्यक असेल तरच बोला, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
मंत्र्यांबाबत सुरू असलेले वाद
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळ सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते वादात सापडले आहेत. त्यातच त्यांनी सरकार भिकारी असल्याचे वक्तव्य केल्याने फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज होते. याशिवाय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची जमीन खरेदी प्रकरणे, त्यांचा नोटांच्या बॅगेसह व्हायरल झालेला व्हिडीओ, त्यांना आयकर विभागाने बजावलेली नोटीस यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच गृहराज्य मंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या आईच्या नावाने परवाना असलेल्या डान्स बारवर पडलेल्या धाडीमुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यापुढे चूक माफ नाही
आतापर्यंत झालेल्या चुका माफ केल्या असल्या तरी यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, सतत केल्या जाणाऱ्या चुका माफ करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
तुमच्यावर आरोप झाल्यास लागलीच खुलासा करा
मंत्री म्हणून तुम्ही चुकीची कामे करू नका. जर चुकीचे काम केले नसेल आणि तुमच्यावर आरोप झाले तर गप्प बसू नका, तातडीने अगदी दोन-तीन तासांत आरोपांवर खुलासा करा, स्पष्टीकरण द्या. कारण खोट्या गोष्टी वारंवार सांगितल्यास त्या खऱ्या वाटतात. त्यामुळे जनतेला योग्य व खरी माहिती देण्यासाठी अशा बाबीवर वेळीच भाष्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.


