Raosaheb Danve On Raj Thackeray : राज्यात ठाकरे बंधूंच्या (राज आणि उद्धव ठाकरे) युतीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या ‘दानव’ या टिप्पणीला आता दानवेंनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी ठाकरेंसारखा कागदी वाघ नाही, तर प्रत्यक्ष रिंगणात डरकाळी फोडणारा खरा वाघ आहे,’ अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना उत्तर दिले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, बुधवारी हॉटेलमध्ये झालेल्या ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत, रावसाहेब दानवे यांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता राज ठाकरे आपल्या भावाच्या मदतीला धावून आले होते. ‘उत्तरे ही देवाला दिली जातात, ‘दानवांना’ नाही,’ असे म्हणत त्यांनी रावसाहेब दानवेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. तथापी, गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी विधानसभा आणि लोकसभेच्या मैदानात डरकाळ्या फोडून निवडून गेलो आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा काळा बुरखा घालून किंवा शेपटी खाली घालून मी कधीही विधान परिषदेत गेलो नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष संपुष्टात येतील. पराभवानंतर कार्यकर्ते सोबत राहणार नाहीत आणि दोन्ही पक्ष इतिहासात जमा होतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला. २०१९ मध्ये भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे जनतेला रुचले नाही. म्हणूनच त्यांचे शिलेदार त्यांना सोडून गेले, असेही दानवे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी ‘दानवेंना पक्षात कोणी विचारत नाही’ या केलेल्या टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रीय मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष केले. जर मला विचारले जात नसते, तर पक्षात इतकी मोठी पदे मिळाली असती का? माझा मुलगा आज तिसऱ्यांदा आमदार झाला आहे, ही माझ्या कामाचीच पावती आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.


