नाशिक: शिवसेना(उबाठा) पक्षाचे माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आज (दि १७) भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यासाठी बडगुजर हे शक्ती प्रदर्शन करत शेकडो वाहनांच्या रॅलीसह आणि हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र, बडगुजर यांच्या या पक्षप्रवेशाला नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. सोमवारी रात्री उशीरा पक्षश्रेष्ठींच्या झालेल्या बैठकीत सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवण्यात आला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच संबंधित घडामोडींची माहिती कोणीही बावनकुळे यांना दिली नव्हती. यानिमित्ताने बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत भारतीय जनता पक्षात असलेला सावळागोंधळ समोर आला.
बडगुजर यांच्या प्रवेशानंतर आता नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी यावर प्रतिक्रिया देत सोमवारी (दि. १६) रात्री नेमकं काय घडलं, हे सांगितले आहे. ते म्हणाले की, “भारतीय जनत पक्षाच्या श्रेष्ठींकडून मध्यरात्री बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुंबई प्रदेश कार्यालयात पोहचण्याचा निरोप आला”. त्यानंतर शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने हे बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशासाठी रवाना झाले होते.


