धुळे: सोलापूर जिल्ह्यातील अनगर (Angar) नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर आता धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेतही भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. येथील नगराध्यक्षपदासाठी भाजप नेते तथा मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. भाजपचे एकूण सात उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत.
महाविकास आघाडी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद
नयन कुवर रावल यांच्यासमोर नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या शरयू भावसार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान हा अर्ज अवैध ठरवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावसार यांचा अर्ज ‘तांत्रिक कारणास्तव’ अवैध ठरवण्यात आला. भाजपने घेतलेल्या आक्षेपानुसार, शरयू भावसार यांचे वडील अॅड. एकनाथ भावसार यांच्या नावे असलेल्या मालमत्तेची घरपट्टी थकबाकी असल्याचे कारण देत हा अर्ज बाद करण्यात आला.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज छाननीत बाद; अनगर नगराध्यक्षपदासाठी BJP चा मार्ग मोकळा
शरयू भावसार यांची जिल्हा न्यायालयात धाव
उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यानंतर शरयू भावसार यांनी या निर्णयाविरोधात धुळे जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
अनगरमध्येही बिनविरोध निवड
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरिषदेतही बिनविरोध निवडीची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या ६० वर्षांत प्रथमच येथे निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. इथे माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्जही छाननी प्रक्रियेत बाद झाला आहे. यामुळे, सोलापूरचे अनगर आणि धुळ्यातील दोंडाई या दोन महत्त्वपूर्ण नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारांच्या बिनविरोध निवडीमुळे सत्ताधारी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.


