Shrikant Shinde Criticizes Raj Thackeray: राज्यातील गडकिल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या नमो पर्यटन केंद्रावरून निर्माण झालेल्या वादानंतर आता राजकारण तापले आहे. राज ठाकरे यांनी केंद्रांबाबत केलेल्या तीव्र विरोधानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी ‘नमो पर्यटन केंद्र फोडून टाकू’ असा इशारा दिल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले, ज्यांच्याकडून काहीही निर्माण होत नाही, ते नेहमी तोडफोडीचीच भाषा करतात. एवढी आगपाखड कशासाठी? हे केंद्र गडकिल्ल्यांवर माहिती आणि सुविधा देण्यासाठी उभारले जात आहे.
श्रीकांत शिंदे यांनी पुढे आठवण करून दिली की, कधीकाळी हेच राज ठाकरे नरेंद्र मोदींचं कौतुक करत होते. आज मात्र त्यांनी विरोधाचं राजकारण सुरू केलं आहे. महायुती सरकार गडकिल्ले आणि मंदिरांच्या संवर्धनाचं काम करतंय, त्यावर टीका करणं म्हणजे विकासाला विरोध आहे, असंही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – इंदुरीकर महाराजांच्या घरी लगीन घाई! लेकीचा शाहीथाटात साखरपुडा; व्हिडिओ व्हायरल
उद्धव ठाकरेंवरही निशाणा
उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, लोकांना आता खरे आणि खोटे कोण हे समजले आहे. अतिवृष्टीच्या वेळी आमच्या सरकारने ३८ हजार कोटींचं मदत पॅकेज जाहीर केलं. आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवत होते, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. त्यामुळे आता शेतकरी त्यांच्या दौर्यांपासून दूर राहतात. निवडणुकीपूर्वी आश्वासने देऊनही लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही.
दरम्यान, राज्य सरकारने पर्यटन विकासासाठी ‘नमो केंद्र’ उभारणीचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांमधून किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती, मार्गदर्शन आणि पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र राज ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवून शिवरायांच्या किल्ल्यांवर मोदींचं नाव असलेलं केंद्र आम्ही फोडून टाकू, असा इशारा दिला होता. या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.


