पिंपरी: काही दिवसांपूर्वीच शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पिंपरी चिचवड शहराध्यक्षपदी संजोग वाघेरे यांची निवड झाली. त्यानंतर काही दिवसांत पक्षाला मोठे भगदाड प्रडले आहे. शहरातील आक्रमक चेहरा म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितत शिंदेच्या शिवसेनेच प्रवेश केला. पिंपरी चिंचवड महापालिकेत १९९७ च्या निवडणकीत सर्वसाधारण जागेवर त्या शिवसेनेकडून नगरसेविका म्हणून प्रथम विजयी झाल्या. तीन वेळा महापालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी कारकिर्द गाजवली. विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला पळता भुई थोडी केली.
महापालिका सभागृहातील अभ्यासू आणि आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांचा दबदबा आहे. हवेली तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या भोसरी विधानसभा मतदारंघातून तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्याविरोधात त्यांनी चुरशीची लढत दिली. त्यावेळी अवघ्या १२०० मतांनी पराभव झाला होता. पुढे २०१४ मध्ये त्यांना पुन्हा शिवसेनेने उमेदवारी दिली होती. दोन वेळा त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचा सलग तीस वर्षांचा सलोखा संपवून सुलभा उबाळे यांनी शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केल्याने शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मागील तीन महिन्यांपासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा होती. अत्यंत कठोर अंतःकरणाने विकास कामे होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या बरोबर राहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संघटन शहरात मजबूत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


