बीड: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी तयारीचा बिगुल वाजवला असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये रणनीती आखण्याचे सत्र सुरू झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये या निवडणुका आघाडी स्वरूपात लढवल्या जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी पक्ष स्वबळावर रिंगणात उतरण्याचा विचार करत आहेत.
या पार्श्वभूमीवर पक्षांतरांच्या हालचालींनाही गती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. ठाकरे गटातील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेते शिंदे गटात किंवा भाजपात दाखल झाले आहेत. आता आणखी एक मोठा धक्का राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पक्षप्रवेशाचा मुहूर्त लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा दावा
बीड जिल्हा आणि मराठवाडा विभागातील राजकीय परिस्थिती सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा रंग घेत आहे. हैदराबाद गॅझेटच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांवर जातीय समीकरणांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जयदत्त क्षीरसागर यांसारख्या प्रभावी ओबीसी नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा राजकीय फायदा ठरू शकतो. दरम्यान, कोल्हापूरच्या चंदगड नगर पंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने युती केल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील इतर ठिकाणीही अशी युती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


