झिम्बाब्वे संघाने अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंका संघालाही हरवले. गटातील चारही सामने जिंकून त्यांनी आघाडीचे स्थान पटकावले. थाटात बाद फेरीत प्रवेश केला. क्रिकेट विश्वात झिम्बाब्वे संघाच्या या प्रवासाला अपघात मानले जात असेल. पण, हा अपघात नाही. हा जाणीवपूर्वक आणि शिस्तबद्ध राबविलेल्या नियोजनाचा परिणाम आहे. अनेक स्थित्यंतराचा अनुभव घेत झिम्बाब्वे संघाने योग्य प्रकारे संघाची पुनर्बांधणी करण्यासाठी वेळ घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या अशा अर्थपूर्ण सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे झिम्बाब्वे संघाची रचना मजबूत झाली आहे. त्यांची स्पर्धात्मकता वाढली. टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता आणि मुख्य फेरीतील कामगिरीने त्यांनी हे दाखवून दिले.
झिम्बाब्वे संघाचा हा प्रवास नुसताच यशाचा नाही, तर त्याला संघर्षाची देखिल जोड आहे. स्पर्धेसाठी श्रीलंकेत दाखल झाल्यावर कँडी येथे रोज आठ तास करावा लागणारा बसप्रवास आणि नंतर पुन्हा क्रिकेट असे झिम्बाब्वे संघाचे चक्र होते. अशा संघर्षमय प्रवासात त्यांना एक प्रकारचा विशिष्ट आत्मविश्वास मिळाला. तो फार मोठा नव्हता किंवा काळजाचा ठोकाही चुकवणारा नव्हता. पण, तो स्थिर होता. आपण कुठल्या स्तरापर्यंत कामगिरी करु शकतो हे त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत दाखवून दिले आहे.
झिम्बाब्वे संघाला त्यांच्या देशात ‘शेवरॉन’ म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे त्यांच्या जर्सीवर असणारे ‘उलटा व्ही’ आकाराचे चिन्ह. हा ‘उलटा व्ही’ ग्रेट झिम्बाब्वे स्टोन स्मारकातील ऐतिहासिक अवशेषांपासून प्रेरित आहे. तो त्यांना सातत्याने सन्मानाने जगण्याची प्रेरणा देत असतो. अशा शेवरॉनने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल आठ फेरीत प्रवेश केला आहे. हा असा पराक्रम आहे की जो खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तर नुसते पाहण्यातच बराच काळ घालवलेल्या क्रिकेट राष्ट्रासाठी खूप मोठा आहे.
दोन वर्षांपूर्वी झिम्बाब्वे संघाने विश्वचषक स्पर्धेचे ध्येय पाहण्यास सुरुवात केली होती. आज २० महिन्यांनी ते त्यांनी साध्य करुन दाकवले आहे. झिम्बाब्वे संघापुढे आता अव्वल आठ फेरीत आव्हानाचा डोंगर असेल देखिल, पण इथपर्यंत पोहचणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे होते. स्वतःवर विश्वास ठेवा ही प्रशिक्षक सॅमन्स यांची शिकवण एकही खेळाडू विसरला नाही. त्यामुळेच स्पर्धेतील पुढील प्रवासासाठी तसे महत्व नसलेल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी जान ओतली. त्यांनी या सामन्यातही आपला वेग कायम ठेवला. मैदानाबाहेर केलेले नियोजन मैदानात तंतोतंत पाळण्यात त्यांनी कसूर सोडली नाही. त्यांनी थाटात अव्वल आठमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्यासमोर आव्हानाचा डोंगर असेल. पण, त्यांच्याकडे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या बलाढ्य संघांना हरवल्याने आलेला आत्मविश्वास असेल. कुणी सांगावे झिम्बाब्वे या गटातूनही आपला पुढचा प्रवास चालू ठेवेल आणि चालू राहिला नाही तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही. त्यांनी क्रिकेट विश्वाला जे दाखवून द्यायचे होते, ते दाखवून दिले आहे. मुख्य म्हणजे अव्वल आठमध्ये प्रवेश केल्यामुळे पुढील विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांनी थेट पात्रता सिद्ध केली आहे. ही स्वयंचलित पात्रता झिम्बाब्वे संघाला भविष्यातील दिर्घकालीन नियोजनात स्थिरता देईल यात शंका नाही.
वीस महिन्यांच्या पायाभूत प्रयत्नांमुळे त्यांना विश्वचषक स्पर्धेच्या अव्वल आठमध्ये प्रवेश मिळाला. आता पुढील आठवड्यात त्यांना जे काही मिळेल ते झिम्बाब्वे क्रिकेटसाठी एक महत्वाचा ठेवा असेल.


