अष्टपैलू
सध्या सुरु असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेबाबत तिसऱ्या दिवशी काय बोलू हा प्रश्न पडला. याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला, तेव्हा विचारचक्र पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार की नाही येथेच अडकले. इम्रान खाजा यांची मुत्सदेगिरी कामी आली असली, तरी पाकिस्तान मंडळाचा सरकारच्या मान्यतेचा हट्ट अजून कायम आहे. पण, पाकिस्तान मंडळाची भारताविरुद्ध खेळण्याची मानसिकता निश्चित तयार झाली आहे. त्यामुळेच या प्रश्नात एक सावध वाढता आशावाद दिसून येतो. स्पर्धेत आज झालेले सामने तसे लिंबू टिंबूच होते. यामध्ये दक्षिण आफ्रिका हा एकमेव प्रमुख संघ होता. बाकीचे ओमान, कॅनडा, स्कॉटलंड, इटली, झिम्बाब्वे संघ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून रुळलेले देखिल नाहीत.
झिम्बाब्वे संघाबद्दल असे दुर्दैवाने बोलावे लागत आहे. हॉटन, अॅण्डी फ्लॉवर, ग्रॅण्ट फ्लवॉर, हिथ स्ट्रिक अशा गुणवान क्रिकेटपटूंनंतर देशातील यादवीमुळे त्यांचे क्रिकेट संपल्यातच जमा होते. अनेक क्रिकेटपटू देश सोडून अन्यत्र आश्रयाला गेले. फ्लॉवर बंधूंचे तर नावच नाही. आयपीएलच्या संघाशी अॅण्डी फ्लॉवर जोडला गेला होता. एवढीच त्याची ओळख राहिली होती. सीन विल्यम्स, सिंकदर रझा, मसाकद्झा अशी काही बऱ्यापैकी नावे होती. पण, त्यापैकी आता रझाच सातत्याने खेळताना दिसतोय. असो, त्यांनी विजयी सलामी दिली आहे. ओमान या नवख्या संघाला त्यांनी हरवले. असाच एक सामना स्कॉटलंड आणि इटली या संघांत झाला. स्कॉटलंड संघ ऐनवेळेस सहभागी झाला. बांगलादेश संघाच्या हकालपट्टीमुळे त्यांना स्पर्धेत स्थान मिळाले. अर्थात, त्यांना विश्वचषक स्पर्धा नवीन नाही. गेल्या स्पर्धेत ते खेळले होते. इटली मात्र प्रथमच खेळत आहे. फुटबॉल ही त्यांची पहिली ओळख. मात्र, आता टेनिसपटू यान्निक सिन्नर ही त्यांची नवी ओळख झाली आहे. क्रिकेटमध्ये ते बाराखडी गिरवत आहेत. या सगळ्यात दादा संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेने कॅनडा संघाला क्रिकेटचे धडे दिले. गतवर्षी उपविजेते असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी या सामन्यातून आपल्या बॅट परजून घेतल्या आहेत. एन्गिडी, रबाडा यांनी आपल्या वेगाची दहशत दाखवून दिली आहे. आता त्यांची ही धार किती टिकते हे येणाऱ्या सामन्यातूनच दिसून येईल.
तोपर्यंत आपण पाकिस्तान भारताशी खेळणार की नाही या चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवू. हा सामना आता तोंडावर आला आहे. क्रिकेटपटू, प्रशासक यांनी नाही, मात्र चाहत्यांनी हा सामना होऊ देत यासाठी निश्चित देव पाण्यात ठेवले असतील. कारण, या सामन्याची तिकिटविक्री केव्हाच हाउसफुल झाली आहे. देशविदेशातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचे आकर्षण असते. नुसते सामन्याचे तिकिट नाही, तर प्रत्येकाचे विमान प्रवासाचे आणि श्रीलंकेतील वास्तव्याचे म्हणजे हॉटेलचेही बुकिंग केले आहे. या सर्वांना आता आपले पैसे वाया तर जाणार नाहीत ना याची चिंता पडली आहे. अर्थात, त्यांच्या चिंतेचे उत्तर त्यांना चोविस तासात आणि ते ही सकारात्मक मिळेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा सर्वाधिक महसूल मिळवून देणारा सामना आहे. हा सामना आयसीसीच्या स्पर्धेत झाला नाही, तर स्पर्धेचे अंदाजपत्रक (बजेट) कसे कोसळते हे २००७ मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अनुभवले आहे. त्यामुळे आयसीसीची कुठलीही स्पर्धा घ्या हे दोन्ही संघ कायम एकाच गटात कसे येतील यावर भर असतो. हे दोन संघ आयसीसी स्पर्धेतच एकमेकांसमोर खेळतात. प्रत्येक वेळेस खेळायचे की नाही यावरुन काथ्याकूट होतो. सरते शेवटी हे दोन्ही संघ सामन्यात खेळतात. या वेळी देखिल खेळणार यात शंका नाही. हा सामना झाला नाही तर या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाल मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार याची प्रत्येकालाच काळजी आहे. आयसीसीने या प्रकरणात मुत्सदेगिरी करण्यासाठी इम्रान ख्वाजा यांची नियुक्ती केली होती. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम हे देखिल सहभागी झाले होते. त्याचबरोबर श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती अशा सर्वांनी पीसीबीला आपला हट्ट सोडण्यास सांगितले होते. बांगलादेशच्या हकालपट्टी प्रकरणानंतर पीसीबीने हे पाऊल उचलले होते. बांगलादेशने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले. पण, अन्य कुणाचेच समर्थन मिळाले नसल्यामुळे बांगलादेशने एक पाऊल मागे घेत पीसीबीलाच भारताविरुद्ध खेळण्याचा हट्ट सोडण्यास सांगितले.
या चर्चेत पीसीबीने आपल्या आणि बांगलादेशच्या बाजूने काही अटी टाकल्या. अर्थात, पाकिस्तानला अट टाकण्याचा अधिकार नाही. त्यांच्या करारावर स्वाक्षरी झाल्या आहेत. त्यानुसारच त्यांना खेळावे लागले. पण, बांगलादेशबाबत आयसीसीने नरमाईचे धोरण घेतले आणि त्यांच्यावर कुठलीही दंडात्मक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. तसेच २०३१ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे त्यांचे संयोजनाचे अधिकारही कायम ठेवले. मलेशियाच्या ख्वाजा यांची मुत्सदेगिरी कामी आली असे म्हणायला जागा असली, तरी शेवटी हा सामना होणारच होता.


