अहमदाबाद : येथे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि पंजाब किंग्ज एकमेकांसमोर येतील. त्यांचे ध्येय प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्यासाठी १८ वर्षांची प्रतीक्षा संपवणे असेल. तथापि, सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील, ज्याने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि सुरुवातीपासून आरसीबीशी संबंधित असूनही तो अद्याप त्याच्या संघाला आयपीएलचा विजेता बनवू शकलेला नाही.
आरसीबी आणि कोहलीचा हा चौथा अंतिम सामना असेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात कोहलीला पाठिंबा देण्यासाठी हजारो चाहते १८ क्रमांकाची जर्सी परिधान करताना दिसतील. आरसीबीने आपल्या भूतकाळातील समस्या मागे टाकल्या आहेत आणि यावेळी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाबला आठ गडी राखून हरवले आणि थेट अंतिम फेरीत पोहोचले. दरवर्षीप्रमाणे यावेळीही कोहलीने (६१४ धावा) चांगली कामगिरी केली आहे. फिल साल्टनेही विराटला चांगली साथ देऊन आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली आहे.
तर मयंक अग्रवाल, कर्णधार रजत पाटीदार आणि जितेश शर्मा हे फलंदाजीच्या क्रमात विश्वासार्ह खेळाडू आहेत. टिम डेव्हिड दुखापतीमुळे आरसीबीच्या शेवटच्या दोन सामन्यांना मुकला होता, त्यामुळे तो या सामन्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही, हे पाहणे बाकी आहे. त्याने रोमारियो शेफर्डसह डेथ ओव्हर्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गोलंदाजीत, शांत आणि संयमी जोश हेझलवूड (२१ बळी) याने आरसीबीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
मुल्लानपूर येथील घरच्या मैदानावर पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीकडून दारुण पराभव पत्करावा लागला असला, तरी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दमदार कामगिरी केली. त्यांनी पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून ११ वर्षांत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. पंजाब किंग्जने कर्णधार अय्यर आणि प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षणीय प्रगती केली आहे. गेल्या वर्षी अय्यर (६०३ धावा) यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन बनवले. अय्यर हा स्पर्धेच्या १८ वर्षांच्या इतिहासात एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याने आयपीएलच्या अंतिम फेरीत तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व केले आहे.


