IPL 2026 Final: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चालू हंगामातील साखळी सामन्यांचा थरार रंगत असतानाच, क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती ती प्ले-ऑफ सामन्यांच्या ठिकाणांबाबत. BCCI ने आता या सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणांची अधिकृत घोषणा केली असून, यावेळेस बंगळुरूच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. प्ले-ऑफचे यजमानपद भूषवण्याची संधी बंगळुरूला मिळालेली नाही, तर अंतिम सामन्याचा मान पुन्हा एकदा अहमदाबादला मिळाला आहे.
साखळी फेरीचा समारोप 24 मे रोजी
IPL 2026 च्या साखळी फेरीतील (League Stage) शेवटचे सामने 24 मे रोजी खेळले जातील. या रविवारी दोन हाय-व्होल्टेज सामने होणार आहेत. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगेल, तर दुसरा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर KKR आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. या सामन्यांनंतर गुणतालिकेतील अव्वल 4 संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील, तर उर्वरित 6 संघांचे आव्हान संपुष्टात येईल.
अहमदाबादमध्ये रंगणार ‘महाअंतिम’ सोहळा
विजेतेपदाचा फैसला करणारा आयपीएलचा अंतिम सामना रविवार, 31 मे 2026 रोजी खेळला जाईल. या भव्य सामन्याचे यजमानपद अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला देण्यात आले आहे. यापूर्वी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमचे नाव चर्चेत होते, परंतु आता अहमदाबादवर शिक्कामोर्तब झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर यंदाचा नवा विजेता कोण ठरणार, याचा फैसला होईल.
प्ले-ऑफ सामने नवीन चंदीगड आणि धर्मशाला येथे
अंतिम सामन्याव्यतिरिक्त उर्वरित तीन महत्त्वाचे प्ले-ऑफ सामने उत्तर भारतात खेळवले जाणार आहेत. यावेळेस धर्मशाला आणि न्यू चंदीगड (मुल्लानपूर) या दोन नवीन ठिकाणांना पसंती देण्यात आली आहे. पहिला क्वालिफायर सामना हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य धर्मशाला स्टेडियमवर होईल, तर एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर सामना न्यू चंदीगडमध्ये खेळवला जाईल. काही राजकीय आणि अंतर्गत कारणांमुळे बंगळुरूला कोणत्याही प्ले-ऑफ सामन्याचे यजमानपद मिळालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
IPL 2026 प्ले-ऑफचे संपूर्ण वेळापत्रक:
क्वालिफायर 1 : 26 मे (धर्मशाला)
एलिमिनेटर : 27 मे (न्यू चंदीगड)
क्वालिफायर 2 : 29 मे (न्यू चंदीगड)
अंतिम सामना : 31 मे (अहमदाबाद)


