नवी दिल्ली : Apple कंपनी 9 सप्टेंबरला त्यांचे लेटेस्ट फोन लाँच करणार आहे. यावेळी कंपनी आयफोन 17 सीरीजमधील चार नवीन फोन, तसेच वॉच सिरीज ११, एसई आणि एअरपॉड्स ३ लाँच करणार आहे. आता या सिरीजच्या लाँचिंगला फक्त दोन दिवस उरले आहेत. त्यातच या सीरीजशी संबंधित अनेक माहिती आपल्या समोर आली आहे.
गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यावेळीही अॅपल चार नवीन फोन लाँच करणार आहे. यावेळी सीरीजमध्ये काही बदल दिसून येतील. असा अंदाज आहे की, कंपनी आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स लाँच करू शकते. यावेळी आपल्याला कोणताही प्लस व्हेरिएंट पाहायला मिळणार नाही. आयफोन १७ मध्ये कंपनी ६.३ इंचाचा प्रोमोशन डिस्प्ले देईल. बेस व्हेरिएंटमध्ये कंपनी प्रमोशन डिस्प्ले देण्याची ही पहिलीच वेळ असेल. याशिवाय, A19 प्रोसेसर दिला जाईल.
तसेच, आयफोन १७ एअर हा ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात स्लीम फोन असणार आहे. हा हँडसेट प्लस व्हेरिएंटची जागा घेईल आणि त्यात ६.६ इंचाचा डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोन A19 प्रोसेसरसह लाँच केला जाईल. त्याच वेळी, यावेळी आपल्याला प्रो आणि प्रो मॅक्सच्या डिझाइनमध्ये बदल देखील दिसू शकतात.
दरम्यान, दोन्ही फोनमध्ये मोठा कॅमेरा मॉड्यूल मिळेल. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ४८ एमपी टेलिफोटो लेन्स दिला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली. मात्र, याच्या किमतीबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.


