नवी दिल्ली : जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा टॅब्लेट वापरत असाल, तर तुम्हाला आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. CERT-In ने एक गंभीर इशारा जारी केला आहे, ज्यात म्हटले आहे की अनेक अँड्रॉइड व्हर्जनमध्ये त्रुटी (vulnerabilities) आढळल्या आहेत. ही समस्या अँड्रॉइड 14, अँड्रॉइड 15, अँड्रॉइड 16 आणि अँड्रॉइड 16 QPR2 मध्ये आढळून आली आहे.
या व्हर्जनवर चालणारे अनेक स्मार्टफोन आणि टॅब्लेट धोक्यात असू शकतात. यामध्ये Vivo, OnePlus, iQOO, Xiaomi, Realme, Motorola, Samsung, Oppo आणि Google Pixel सारख्या ब्रँड्सच्या डिव्हाईसेसचा समावेश आहे. अहवालानुसार, हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊन लिंकवर क्लिक न करताही डिव्हाईसेसवर हल्ला करू शकतात. ते तुमच्या फोनवर धोकादायक कोड चालवू शकतात, सिस्टम क्रॅश करू शकतात किंवा तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश मिळवू शकतात. इतकेच नाही, तर हॅकर्स तुमच्या फोनमध्ये प्रवेश मिळवून तुमचा डेटा चोरू शकतात किंवा डिव्हाइसवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकतात.
दरम्यान, ही समस्या अँड्रॉइड सिस्टीमच्या अनेक भागांमध्ये आढळली आहे, जसे की अँड्रॉइड फ्रेमवर्क आणि विशिष्ट हार्डवेअर घटकांशी संबंधित सॉफ्टवेअर. या त्रुटींमुळे रिमोट हल्ले शक्य होतात, म्हणजेच कोणीतरी तुमच्या डिव्हाइसला दूरस्थपणे लक्ष्य करू शकते.
संरक्षण कसे करावे?
असे सायबर हल्ले टाळण्यासाठी, तुम्ही अनेक महत्त्वाच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. सर्वप्रथम, तुमचा फोन नेहमी अपडेटेड ठेवा, कारण कंपन्या वेळोवेळी सुरक्षा पॅचेस जारी करतात. सेटिंग्जमध्ये सिस्टीम अपडेट्स नक्की तपासा आणि उपलब्ध असलेले कोणतेही अपडेट्स त्वरित इन्स्टॉल करा.


