Raigad Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाट परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्यावरून माणगावच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका कारवर अचानक डोंगरावरून मोठा दगड कोसळला. या घटनेत ४३ वर्षीय स्नेहल गुजराथी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चालत्या कारवर कोसळला दगड
ताम्हिणी घाटातील कोंडीथर गावाच्या हद्दीत आज सकाळी हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती दगड सैल झाले होते. त्याच दरम्यान, घाटातून एक अलिशान कार जात असताना अचानक डोंगरावरून मोठा दगड वेगाने खाली आला आणि थेट कारच्या सनरुफवर (Sunroof) आदळला. दगडाचा वेग इतका होता की तो सनरुफ फोडून आतमध्ये शिरला आणि कारमध्ये पुढील बाजूस बसलेल्या स्नेहल गुजराथी यांच्या डोक्यावर आदळला. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली.
हेही वाचा –फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; हॉटेच्या रूममधलं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
उपचाराआधीच मृत्यू
अपघातानंतर तात्काळ स्नेहल गुजराथी यांना जवळच्या मोदी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. स्नेहल गुजराथी या आपल्या कुटुंबासह पुण्यावरून माणगावकडे प्रवास करत होत्या. गेल्या काही दिवसांपासून ताम्हिणी घाट परिसरात जोरदार पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे दरडीचा भाग सैल झाल्याने डोंगरावरील दगड आणि गोटे रस्त्यावर येऊ लागले आहेत. प्रशासनाने काही ठिकाणी वाहतुकीसाठी सतर्कतेचा इशारा दिला होता.
स्थानिक प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
या घटनेनंतर पोलिसांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) ताम्हिणी घाटातील दरडीधोक्याच्या भागात वाहतूक काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. पर्यटक आणि वाहनचालकांना पावसाळ्यात या घाटात प्रवास करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


