Siddharth Venugopal: मल्याळम टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आणि उमदा अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल याची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे मल्याळम चित्रपट आणि मालिका सृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दोन वर्षांपासून सुरू होता संघर्ष
सिद्धार्थ गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत होता. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा जी. नायर या सिद्धार्थची आईप्रमाणे काळजी घेत होत्या. त्याच्या उपचारांसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. सीमा यांनी फेसबुकवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत सिद्धार्थच्या निधनाची माहिती दिली. “सर्व आशा आता संपल्या आहेत, आज देवाने ठरवले की तुला आता आणखी त्रास होऊ नये,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अभिनयाचा प्रवास
मुळचा त्रिशूरमधील चालकुडी येथील रहिवासी असलेल्या सिद्धार्थला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ होती. महाविद्यालयीन जीवनात त्याने रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने निवेदक म्हणूनही ओळख निर्माण केली. निर्माता अरुण घोष यांच्या मदतीने त्याने टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केले. ‘कस्तुरीमन’ आणि ‘भाग्यजातकम’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.
कलाकारांकडून श्रद्धांजली
अभिनेता किशोर सत्या यानेही सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण केली. “एक चांगला कलाकार खूप लवकर आपल्यातून निघून गेला,” असे म्हणत त्याने सिद्धार्थच्या संघर्षाचे आणि सीमा नायर यांनी त्याला दिलेल्या साथीचे कौतुक केले. सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि धाकटा भाऊ असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.


