नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अॅक्टिव्ह आहेत. त्यात मेटा कंपनी त्यांच्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सतत नवीन फीचर्ससह अपडेट करत आहे. कंपनी सध्या एका फीचरची चाचणी घेत आहे ज्यामुळे युजर्संना फेसबुकसारखे कव्हर फोटो सेट करता येणार आहे. हे फीचर सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे. मात्र, हे फीचर लवकरच सर्वच युजर्ससाठी मिळणार आहे.
आतापर्यंत, व्हॉट्सअॅप युजर्स फक्त प्रोफाईल फोटो सेट करू शकत होते. मात्र, येणाऱ्या अपडेटमध्ये, ते कव्हर फोटो देखील सेट करू शकतील. हे फीचर प्रोफाईल सेटिंग्जमध्ये उपलब्ध असेल, जिथे युजर्स त्यांच्या आवडीची कोणतीही कव्हर इमेज निवडू शकतात. कव्हर फोटो प्रोफाईल पिक्चरच्या वर दिसेल आणि आकाराने बराच मोठा आणि रुंद असेल. युजर्स ते सर्वांना, फक्त त्यांच्या संपर्कांना किंवा कोणालाही दाखवायचे नाही हे निवडू शकतील. ही सेटिंग प्रायव्हसी टॅब अंतर्गत असेल.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर सध्या व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे. सध्या ते अंतर्गत चाचणीत आहे, परंतु येत्या काही आठवड्यात ते अधिक युजर्ससाठी सार्वजनिक बीटा म्हणून रिलीज केले जाऊ शकते. WhatsApp Business Profiles मध्ये आधीच एक कव्हर फोटो फीचर आहे, जे आता सर्वच युजर्ससाठी असणार आहे. या मोठा फायदा होणार आहे.


