सांगली : जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वासुंबे गावाजवळील स्मशानभूमीत अघोरी पूजेचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावकऱ्यांनी काल संध्याकाळी स्मशानभूमीत चार आयडेंटी साइजचे फोटो, काळी बाहुली, लिंबू-मिरच्या, कवाळ आणि गुलाल लावलेली पूजेची मांडणी पाहिली. हे दृश्य पाहताच नागरिक थरकापले. अद्याप या फोटोतील व्यक्ती कोण आहेत, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. या पूजेचा नेमका उद्देश काय आणि त्यामागे कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
तंत्रज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे सावट संपलेले नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून, वासुंबे गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तासगाव पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.


