पुणे : कोंढवा येथील येवलेवाडी भागातील एचपी पेट्रोल पंपाजवळ शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अज्ञात गुंडांनी रिक्षाचालक गणेश काळे (वय ३८) यांच्यावर अचानक गोळ्या झाडून हत्या केली. तीन गोळ्या लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला, तर घटनेचं थरारक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. या फुटेजमध्ये हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर कोयत्याने वार करून पळ काढल्याचं दिसतंय. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून, पोलिसांनी अवघ्या चार तासांत चार आरोपींना खेड शिवापूर परिसरातून ताब्यात घेतलं आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे विशेष तपास पथकं तयार करण्यात आली. कोंढवा डीबी पथकाने एपीआय अफरोज पठाण, सूरज शुक्ला, विशाल मेमाणे आणि अभिजीत जाधव यांच्या नेतृत्वात तपास हाती घेतला.
यात अटकेतील दोन अल्पवयीन आरोपींसह अमान मेहबूब शेख (२२, रा. येवलेवाडी) आणि अरबाज अहमद पटेल (२४, रा. कोंढवा) यांना पकडण्यात यश आलं. आरोपींकडून दोन देशी पिस्तुलं, जिवंत काडतूस आणि दोन कोयते जप्त करण्यात आली आहेत.
गणेश काळे हे गायकवाड टोळीतील कुख्यात गुंड समीर काळे याचे धाकटे भाऊ आहेत. समीर काळे हा टोळीतील प्रमुख नंबरदार असून, वर्षापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्याकांडात मुख्य आरोपी म्हणून तो अटकेत आहे. त्या प्रकरणात समीरने बंदूक पुरवठा केल्याचा पोलिस तपासात उलगडा झाला होता. या पार्श्वभूमीवर गणेशच्या हत्येला टोळीयुद्धाची किनारा असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आंदेकर हत्येनंतर प्रतिस्पर्धी टोळ्यांमधील वैर वाढलं असल्याचं सांगितलं जातंय.
घटनाकाळी खडी मशीन चौकात नागरिकांची वर्दळ सुरू असताना अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने लोक पळापळ करू लागले. स्थानिकांनी तात्काळ कोंढवा पोलीस ठाण्याला सूचित केलं, तर पोलिस पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठवला. सध्या सीसीटीव्ही फुटेजचा सखोल तपास सुरू असून, आरोपींच्या शोधासाठी आणखी पथकं रवाना झाली आहेत.
गेल्या काही महिन्यांत पुण्यात अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, ही घटना शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. पोलिसांनी तपास अधिक वेगवान करताना टोळीशी संबंधित इतर संशयितांवरही नजर ठेवली आहे.


