मुंबई : चित्रपटसृष्टीत एस. एस. राजामौली यांचे नाव चांगलेच प्रसिद्ध आहे. त्यांनी उत्तरेत दक्षिण भारतीय चित्रपटांना लोकप्रिय करण्यात मोठी भूमिका बजावली असे मानले जाते. एकेकाळी दक्षिण भारतीय चित्रपट उत्तरेत चांगले चालत नव्हते. मात्र, जेव्हा एस. एस. राजामौली यांनी २०१५ मध्ये ‘बाहुबली’ प्रदर्शित केला तेव्हा संपूर्ण चित्रच बदलले. चाहत्यांना दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये रस वाढू लागला. त्यामुळे या चित्रपटांची कमाईही अधिक होऊ लागली.
10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला बाहुबली आता एस. एस. राजामौली यांचा द एपिक ‘बाहुबली’ थिएटर्समध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. ‘बाहुबली’च्या चाहत्यांची संख्या वर्णन करण्यापलीकडे आहे. १० वर्षांपूर्वी त्याने मिळवलेला हिंदी बॉक्स ऑफिसवरील परफॉर्मन्स अभूतपूर्व होता. ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांनी जगभरात विशेष अशी कामगिरी केली. आता, १० वर्षांनंतर, एस. एस. राजामौली यांनी तो चित्रपटगृहांमध्ये परत आणला आहे. पण यावेळी, त्याने त्याच्या चित्रपटाचे दोन्ही भाग एकत्र करून ‘बाहुबली : द एपिक’ हा एकच चित्रपट बनवला.
हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहण्यासाठी चाहते आधीच उत्सुक होते. इतकेच नाहीतर अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यावर, हैदराबादमधील शो भरले होते. ‘बाहुबली : द एपिक’ ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. मात्र, निर्मात्यांनी ३० ऑक्टोबर रोजी तेलुगू प्रेक्षकांसाठी एक विशेष शो आयोजित केला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.


