पुणे : आरोपीला मदत करण्यासाठी आणि त्याच्या वडिलांच्या जामीन अर्जावर सकारात्मक भूमिका घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच मागणारा पोलिस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी रास्ता पेठ परिसरात ४६ लाख ५० हजार रुपये घेताना रंगेहात पकडले.
यातील एक कोटी स्वतःसाठी आणि दुसरे कोटी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी असल्याचे त्याने सांगितले होते. चिंतामणी हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असून, मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जुले (ता. पारनेर) येथील आहेत. समर्थ पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून, त्यांच्या अशिलाविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाचा तपास चिंतामणी यांच्याकडे होता. अशिलाच्या वडिलांना अटक झाली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सुरुवातीला दोन लाखांची मागणी केल्यानंतर तपासादरम्यान चिंतामणी यांनी अचानक दोन कोटींची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली.
एसीबीच्या सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांच्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला.
रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिरासमोर तक्रारदाराकडून लाच घेताना चिंतामणी यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त रकमेत दीड लाखांच्या खऱ्या नोटा आणि ४५ लाखांच्या बनावट नोटांचा समावेश आहे. कारवाईनंतर चिंतामणी यांच्या भोसरीतील दिघी रस्त्यावरील सोपान रेसिडेन्सी येथील घर आणि कार्यालयावर एसीबीने झडती सुरू केली आहे.


