पुणे : राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह पावसाचा अंदाज असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
रविवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. मुंबईसह कोकण विभागातही पावसाचा जोर कायम होता.
पावसाच्या उघडीपामुळे काही भागांत कमाल तापमान पुन्हा वाढू लागले असून, अनेक ठिकाणी ३० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंद झाली. अमरावतीत सर्वाधिक ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, महाबळेश्वर येथे नीचांकी १६.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.
अरबी समुद्रात गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली आज निवळून जाण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडा परिसरावर देखील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.


