पुणे : स्वतःला आयपीएस अधिकारी सांगून पुणे पोलिस आयुक्तालयात घुसणाऱ्या व्यक्तीला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. सागर वाघमोडे असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवासी आहे. काही दिवसांपासून तो विविध ठिकाणी बनावट आयपीएस म्हणून वावरत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
तपासादरम्यान, त्याने आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असून, त्याचा उद्देश आणि कोणत्या अधिकाऱ्यांना नेमके भेटण्याचा हेतू असावा, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, वाघमोडे याने आयुक्तालयात पोहोचून स्वतःला आयपीएस अधिकारी सांगितले. त्यानंतर त्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटून “माझा मित्रही आयपीएस आहे” असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या या ‘मित्रा’बाबत अधिक माहिती विचारली असता, त्याने जे नाव सांगितले ते अधिकारी समोर आल्यानंतर त्याची खोटारूपी उघड झाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी तत्काळ चौकशी केली, ज्यात हा बनावट प्रकार समोर आला. सध्या वाघमोडे पुण्यात किती दिवसांपासून होता, आयुक्तालयात कधी आणि कशासाठी आला, कोणत्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, याबाबत सविस्तर तपास सुरू आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या पार्श्वभूमीची खातरजमा केली जात आहे.
PSI प्रमोद चिंतामणीला २ कोटींच्या लाच प्रकरणात अटक
दरम्यान, पुणे पोलिस आयुक्तालयात अजून एक भ्रष्टाचाराचा धक्का बसला. आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. चिंतामणी हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असून, मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जुले (ता. पारनेर) येथील आहेत.


