रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वृद्ध दांपत्याच्या घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांना हत्येचा तीव्र संशय आहे. प्राथमिक तपासात दांपत्याच्या मुलांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
महादेव कांबळे (वय ९५) व विठाबाई कांबळे (वय ८३) हे दांपत्य मेंदडी गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होते. शनिवारी (ता. १ नोव्हेंबर) दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला. कुजलेल्या वासाने शेजाऱ्यांचे लक्ष वेधले गेले, ज्यामुळे घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.
म्हसळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्कॉड पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात हत्येचा संशय व्यक्त करून पोलिसांनी नमुने गोळा केले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. दांपत्याच्या दोन मुलांवरच हत्येचा संशय आहे. नरेश कांबळे व चंद्रकांत कांबळे हे दोघे आई-वडिलांना घरखर्च देत नसल्याचा व घरात राहू न देत असल्याचा राग मनात धरून होते. याच रागावेगळे त्यांनी मिळून हत्या करून टाकली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अवघ्या २४ तासांत पोलिसांनी तपास उलगडला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांची भूमिका कायम राहिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसळा पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करीत असून, कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी केली जात आहे.


