Chhatrapati Sambhajinagr: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात काही कर्मचाऱ्यांनी मतिमंद विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही धक्कादायक दृश्यं कैद झाली आहेत. कुकरच्या झाकणाने, लाथा-बुक्क्यांनी आणि चापट मारून या निरागस विद्यार्थ्यांचा निर्दयपणे छळ करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. समाजातील सर्वच स्तरांतून मानवतेचा अंत झालाय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निरागस लेकरांवर अत्याचार
ज्यांना स्वतःची वेदना व्यक्त करता येत नाही, अशा मतिमंद विद्यार्थ्यांवर सहानुभूतीऐवजी हिंसा करण्यात आली. जे हात त्यांना आधार देण्यासाठी होते, तेच हात अत्याचार करणारे बनले. या प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. दीपक इंगळे आणि प्रदीप देहाडे. दीपक इंगळे, गेल्या 10 वर्षांपासून शिपाई म्हणून कार्यरत होता. त्याने एका विद्यार्थ्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तो संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. तथापि, प्रदीप देहाडे, संस्थेतील काळजीवाहक असून, तोदेखील विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याच्यावरही गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेनंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी सांगितलं की, दोन्ही आरोपींविरोधात कायद्यानुसार कडक कारवाई केली जात आहे. तसेच, संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थापनाचीही चौकशी सुरू आहे.
मंत्री अतुल सावे यांची संतप्त प्रतिक्रिया
ही घटना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यात घडल्याने प्रशासनावर टीका होत आहे. सावे यांनी म्हटलं आहे की, या संस्थांमध्ये सरकारने या मुलांच्या काळजीसाठी विश्वासाने सुविधा उभ्या केल्या आहेत. पण जर ह्याच संस्था छळछावण्या बनत असतील, तर आपण समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत. या मुलांना दया नको, तर सन्मान आणि सुरक्षितता हवी. त्यांच्या अश्रूंनी शासन आणि समाज दोघांचीही मने हळहळली पाहिजेत नाहीतर माणुसकीचं कुकरचं झाकण कायमचं बंद होईल. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि संस्थेच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


