पिंपरी-चिंचवड : शिक्षणाच्या मंदिराला कलंक लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली बोलावून शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाने स्थानिक परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाचे नाव चेतन चव्हाण असे असून, तो स्थानिक शिक्षण संस्थेत कार्यरत आहे. पूर्व परीक्षांची तयारी सुरू असताना शिक्षकाने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना ‘अतिरिक्त क्लासेस’साठी बोलावले होते. त्यातील एका मुलीचा शनिवारी दुपारी क्लासदरम्यान लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे.
क्लासच्या नावाखाली घृणास्पद कृत्य
सदर दिवशी आरोपीने पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला क्लासमध्ये बोलावले. मैत्रिणीला ‘रसायनशास्त्राचा पेपर सोडव’ म्हणत चौथ्या मजल्यावर पाठवले, तर दुसरीकडे पीडित मुलीला लिफ्टमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर ऑफिस बंद करण्याच्या कारणाने पुन्हा तिला खाली बोलावले आणि पुन्हा एकदा लिफ्टमध्ये तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
या धक्कादायक प्रसंगानंतर घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन आपल्या वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. पीडितेच्या वडिलांनी तत्काळ निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी शिक्षक चेतन चव्हाण याच्याविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न
राज्यात अलीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. डॉक्टर महिला मृत्यूप्रकरणाचे पडसाद अजून कमी झाले नाहीत, अशातचं आता शैक्षणिक ठिकाणीच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता शाळा आणि क्लासरूमपर्यंत पोहोचला आहे.


