Pickleball World Cup 2025: अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये पार पडलेल्या पिकलबॉल विश्वचषक २०२५ मध्ये भारताला मोठं यश मिळालं. पुण्याचा माजी डेव्हिस कपपटू नित्तेन किर्तने याने या स्पर्धेत दोन सुवर्णपदकं जिंकत देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. किर्तनेने ५०+ पुरुष एकेरी आणि ५०+ पुरुष दुहेरी या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. दुहेरी प्रकारात त्याची जोडी पिकलबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सूर्यवीर भुल्लर यांच्यासोबत जमली होती. फ्लोरिडामध्ये २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत ६८ देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. या दुहेरी विजयामुळे नित्तेन किर्तने भारतातील पिकलबॉल क्षेत्रातील सर्वाधिक यशस्वी खेळाडूंपैकी एक ठरला आहे.
दोन सुवर्णपदकांसह पुण्यात परतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना किर्तने म्हणाले, ‘माझ्यासाठी हा आयुष्यातला पूर्णत्वाचा क्षण आहे. २०१८ मध्ये फ्लोरिडामध्येच मी माझं पहिलं जागतिक टेनिस पदक जिंकलं होतं, आणि आता पुन्हा इथेच पिकलबॉलमध्ये दुहेरी सुवर्ण मिळालं हे खूप खास आहे.’ २०१८ मध्ये किर्तनेने लाटव्हियाच्या व्लाडा किरिलोव्स्काससोबत जागतिक टेनिस चॅम्पियनशिप (४०+) मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते.
टेनिसहून पिकलबॉलकडे प्रवास
नित्तेन किर्तने यांनी सांगितले की टेनिसहून पिकलबॉलकडे वळणे हा बदल नव्हता, तर नैसर्गिक प्रवास होता. दोन्ही खेळ एकमेकांना पूरक आहेत. पिकलबॉलमुळे माझी प्रतिक्रिया आणि बॉलवरील नियंत्रण सुधारले. त्यामुळे माझा टेनिस खेळही अधिक धारदार झाला.
भारतात पिकलबॉलचा वाढता प्रभाव
किर्तने यांनी भारतात पिकलबॉलच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दलही मत व्यक्त केले, हा सर्व वयोगटांसाठी खेळता येणारा सामाजिक आणि मजेशीर खेळ आहे. भारतातही या खेळात प्रचंड क्षमता आहे. फक्त खेळाडूंना क्रिकेटपटूंप्रमाणे थोडी ओळख आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पिकलबॉल हा टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिसचा संयोग असलेला खेळ असून, तो बॅडमिंटन कोर्टाच्या आकाराच्या मैदानावर पॅडल आणि छिद्रित बॉलने खेळला जातो. पुणे, मुंबई, बेंगळुरू आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये पिकलबॉल क्लब आणि लीग झपाट्याने वाढत असून, भारतात या खेळाचं भविष्य उज्ज्वल दिसत आहे.


