मुंबई: पार्थ पवारांमुळे अजित पवारांना सगळे घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजित पवारांविरोधात राजकारण पेटलं असतानाच आता त्यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. अजित पवारांनी या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. ‘मी कुणालाही फोन केला नाही किंवा चुकीच्या कामाला माझं कसलंही समर्थन नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी जरुन चौकशी करावी’, असेही त्यांनी म्हटले.
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल 400 एकर जमीन अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा व्यवहार करताना केवळ 500 रुपयांच्या स्टँप ड्युटीवरुन ही खरेदी झाल्याने शासनाचा तब्बल 21 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचेही समोर आलं आहे. या व्यवहाराच्या घटनेनं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात बोलण्यासाठी विरोधकांना आयत कोलित मिळालं आहे.
मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या नातेवाईकांसंदर्भात, त्यांना फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केला नाही, कुणाला सांगितलेलं नाही. याउलट मी उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगेल की, जर माझ्या नावाचा वापर करुन कुणी चुकीचं करत असेल, नियमात न बसणारं करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी फार कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्र्यांनी जरुर चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.


