Loni Kalbhor Garbage Scam: पुणे शहराच्या सीमेलगत असलेल्या लोणी काळभोर परिसरातील नागरिक आणि शेतकरी सध्या गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहेत. मागील सात ते आठ वर्षांपासून येथील वडाळे वस्ती परिसरात महापालिकेच्या गाड्यांतून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो आहे. शहरातील स्वच्छतेसाठी उभारलेली यंत्रणा प्रत्यक्षात ग्रामीण भाग प्रदूषित करत असल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वन विभाग आणि महापालिकेतील काही अधिकारी ठेकेदारांशी संगनमत करून या भागात सुमारे दीड चौरस किलोमीटर परिसरात मिक्स कचऱ्याचे ढीग लावले आहेत. यातील लिचेट (द्रव विषारी द्रव्य) जवळील ओढ्यात मिसळून विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आता पिण्यासाठी आरओ पाणी विकत घ्यावे लागत आहे.
प्रदूषणाचा फटका शेती व पशुपालनालाही
कचऱ्यामुळे या परिसरात डुकरं आणि भटकी कुत्री मोठ्या संख्येने जमा होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कचरा वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, पोल्ट्री फार्मधील पक्ष्यांवरही प्रदूषणाचा परिणाम होत आहे.
कागदावर शेतकऱ्यांसाठी खत, प्रत्यक्षात बेकायदेशीर डंपिंग
महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या मागणीवरून ओला कचरा खतासाठी पाठविला जातो असे दाखवले जाते. परंतु, प्रत्यक्षात हा कचरा शेतकऱ्यांच्या शेतात न जाता बेकायदेशीररीत्या वडाळे वस्ती परिसरातच टाकला जातो. महापालिका ठेकेदारांना प्रति टन कचऱ्यावर 700 रुपये देत असून, या व्यवहारातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा – पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे 35 टक्के काम पूर्ण
वन विभागाची संशयास्पद भूमिका
वन विभागाच्या हद्दीतच कचरा साठवला जात असतानाही संबंधित बीट मार्शल आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या सगळ्या कारस्थानात त्यांचेही संगनमत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लवकरच NGT कडे तक्रार; नागरिकांचा इशारा
स्थानिक ग्रामस्थ निलेश काळभोर यांनी सांगितले की, “या भागातील पाण्याचे स्रोत आणि शेती प्रदूषित झाली आहे. वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही आता राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) औपचारिक तक्रार दाखल करणार आहोत.”
महापालिकेकडून नुकसानभरपाईची मागणी
दरम्यान, भटकी जनावरे आणि प्रदूषणामुळे शेतीचे व घरांचे नुकसान झाल्याचे स्थानिक शुभम काळभोर यांनी सांगितले. त्यांनी मागणी केली की, महापालिकेने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि परिसर पूर्णपणे स्वच्छ करावा.


