Pimpri Nigdi Metro: पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या स्वारगेट–पीएमसीएमसी मेट्रोमार्गाच्या विस्ताराला आता गती मिळाली आहे. एकूण 4.5 किलोमीटर लांबीच्या पिंपरी-निगडी मार्गातील सुमारे 35 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज मेट्रो अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक परिसराला थेट मेट्रोची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे पुण्यापर्यंतचा प्रवासाचा वेळ 30 टक्क्यांनी कमी होणार आहे.
या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 910 कोटी 18 लाख असून मार्ग पूर्णपणे इलेव्हेटेड प्रकारचा आहे. तो जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या मध्यभागी उभारला जात आहे. हा मार्ग पीएमसीएमसी ते भक्ती-शक्ती चौक असा 4 टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. पीएमसीएमसी ते चिंचवड (1.463 किमी), चिंचवड ते आकुर्डी (1.651 किमी), आकुर्डी ते निगडी (1.062 किमी) आणि निगडी ते भक्ती-शक्ती चौक (0.975 किमी).
हेही वाचा – Pune Traffic : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
चार नवी स्थानके
विस्तारित मार्गावर चार प्रमुख स्थानके उभारली जात आहेत –
- चिंचवड स्थानक – औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांसाठी महत्त्वाचे.
- खंडोबा माळ चौक (आकुर्डी)
- टिळक चौक (निगडी)
- भक्ती-शक्ती चौक – देहू, चिखली, वडगाव आणि तळेगाव परिसराला जोडणारे वाहतूक केंद्र.
ही स्थानके पीएमपी बस, रेल्वे आणि ऑटोरिक्षा नेटवर्कशी जोडली जात असल्याने या भागातील प्रवासी सोयी वाढणार आहेत. त्यामुळे रहिवासी आणि व्यावसायिक विस्ताराला गती मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातील 151 पिलरांपैकी 60 पेक्षा जास्त पिलर सध्या उभारले गेले आहेत, तर 78 हून अधिक पिलर कॅप्स आणि फाउंडेशन वर्क पूर्ण झाले आहे. हे सर्व पिलर भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले जात आहेत.
सेगमेंट बांधकामाचा टप्पा
या मार्गासाठी 1,337 सेगमेंट्स तयार करण्यात येणार आहेत. यापैकी एप्रिलपर्यंत 517 सेगमेंट्स पूर्ण झाले होते. ऑक्टोबरपासून निगडी ते चिंचवड दरम्यान सेगमेंट्स लाँचिंगचे काम सुरू झाले आहे. खंडोबा माळ चौक येथे पहिला सेगमेंट लाँचिंग गर्डरद्वारे बसवण्यात आला आहे. मेट्रो प्रशासनाच्या मते, सर्व परवानग्या आणि भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील 14 महिन्यांत उर्वरित काम गतिमान होणार असून, 2026 अखेर पुणे-पिंपरी-निगडी मेट्रो प्रवास सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


