मंचर: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील रोहन विलास बोंबे (वय 13 वर्षे) या शाळकरी मुलाचा नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्याच्या निषेधार्थ व वन विभागाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ गायमुख-नंदीचौक (ता.आंबेगाव) येथे सोमवारी 3 तारखेला करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झालेल्या 31 जणांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अजित रघुनाथ पवार यांनी गुरुवारी 6 तारखेला रात्री दहा वाजता मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सार्वजनिक सुव्यवस्था भंग, वाहतूक अडथळा, अधिकाऱ्यांना काम करू न देणे व सरकारी नियम न पाळणे असे गुन्ह्याचे स्वरूप आहे.
बेकायदेशीर जमाव जमवून महामार्गावरील वाहने अडवून लोकसेवक यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता लोकसेवकांचे सार्वजनिक कार्य पार पाडण्यास अटकाव करून रस्ता रोको आंदोलन केले आहे. म्हणून माझी त्यांची विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. गुन्हा दाखल नावे – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाअध्यक्ष देवदत्त निकम, उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष जिल्हा अध्यक्ष सुरेश भोर, शिवसेनेचे नेते रमेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अरुण गिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर, दत्ता गांजळे, बाळासाहेब बाणखेले, नित्यानंद येवले, धोंडिभाऊ भोर, कुणाल बाणखेले, विशाल वाबळे, पूजा वळसे पाटील, निलेश वळसे पाटील, नरेश ढोमे, शरद बोंबे, सचिन बोंबे, भोलानाथ पडवळ, किरण ढोबळे, दिलीप वाळुंज, रवी वळसे पाटील, सुभाष पोकळे, दामू घोडे, विकास गायकवाड, जयेश भालेराव, वनाजी बांगर, अजित चव्हाण, दिपक पोखरकर, भाऊसाहेब सांवत, राजेंद्र दाभाडे, विकास वरे, सौरभ उर्फ वैभव पोखरकर यांच्यासह एकूण 31 जण व अन्य 250 कार्यकर्ते.
“सोमवारी (ता.३) सकाळी 11 वाजता सुरू झालेले रस्ता रोको आंदोलन मंगळवारी 4 तारखेला सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे मंचर परिसरात महामार्गाच्या दोन्ही बाजुने वाहतूक कोंडी झाली होती.


