जळगाव: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे अरुण गुजराती आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
शरद पवारांचा जुना सहकारी आता अजित पवारांसोबत
अरुण गुजराती हे काँग्रेसपासूनच शरद पवारांसोबत कार्यरत होते. त्यांनी पक्षात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते चोपडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार देखील राहिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजराती आज संध्याकाळी ५ वाजता महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. सकाळी त्यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली होती, त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कळते.
हेही वाचा – राजकीय गणित बदललं! परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर
आपल्या निर्णयाबाबत बोलताना अरुण गुजराती म्हणाले, शरद पवार साहेबांसोबतचा काळ आनंदाचा गेला. त्यांनी मला मोठं केलं, कार्यकर्त्यांनी मला पुढे आणलं. मात्र, या दोघांमध्ये मी अडकलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे मी हा निर्णय घेतला.
राजकीय समीकरणांवर परिणाम
गुजरातींचा हा निर्णय जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीकरणांमध्ये मोठा बदल घडवू शकतो. राजकीय जाणकारांच्या मते, या पावलामुळे शरद पवार गटाची ताकद कमी होणार, तर अजित पवार गटाचे बळ वाढणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून शरद पवारांसोबत राहिलेल्या नेत्याचा असा निर्णय राज्यातील राष्ट्रवादीच्या गोटात मोठी चर्चा रंगवणारा ठरला आहे.


