मुंबई : बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. धर्मेंद्र यांच्यावर वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच देशभरातील लोक त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत होते. चित्रपटसृष्टीतील मोठे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. बॉलिवूड स्टार्स देखील त्यांना पाहण्यासाठी सतत रुग्णालयात येत होते. धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, देओल कुटुंबाने एक अधिकृत निवेदन जारी केले. ज्यामध्ये त्यांना सध्या गोपनीयता राखण्याची विनंती करण्यात आली आहे. सनी देओलच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “धर्मेंद्रजी रुग्णालयातून घरी परतले आहेत आणि त्यांची प्रकृती चांगली आहे. आम्ही मीडिया आणि सर्वांना अनावश्यक गोष्टी टाळण्याची विनंती करतो”.
देशभरातील लोक धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत होते. पण आता दिलासा देणारी बातमी आली आहे. धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांची टीम आता घरीच धर्मेंद्र यांच्यावर उपचार करेल, असे सांगण्यात आले आहे. सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्सने आनंद व्यक्त केला.


