मुंबई: भाजपनं बिहारमध्ये दणदणीत यश मिळवल. त्या विजयानंतर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आणि भाजपचं अभिनंदन केलं. मी कट्टर भाजप समर्थक असल्यानं बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद असल्याची प्रतिक्रिया निवेदिता सराफ यांनी दिली. ठाण्यात पुरस्कार सोहळ्यात निवेदिता सराफ यांनी हे वक्तव्य केलंय. मराठी कलाकारांकडून भाजपचं जाहीररित्या समर्थन आणि कौतुक करण्याचा आता नवा ट्रेंडच सुरू झाला आहे. याआधी मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही जाहीरपणे मोदी आणि भाजपला समर्थन दिलं होतं. तसंच मुंबईत भाजपचाच महापौर होणार असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना भरपूर ट्रोल करण्यात आलं.
काय म्हणाल्या निवेदिता?
‘आज जी मी काही आहे ते माझे गुरु ,पती यांच्यामुळे आहे. आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला, याचा विशेष आनंद असल्याचे निवेदिता सराफ यांनी म्हटलंय. आमदार संजय केळकर यांचे बिहार विजयासाठी अभिनंदन. मी कट्टर बीजेपी असल्याने मला खूप आनंद झाले.‘ माझ्या आयुष्यात अभिनयाची सुरुवात बालरंगभूमी पासून झाली. सुधा करमरकर माझ्या गुरु . त्यांच्या संस्थेत अनेक बाल नाट्य केलं. मला स्टेजवर उभे राहायला कोणी शिकवले तर ते सुधाताई यांनी. त्या काळात रत्नाकर मतकरी ,सुधाताई हे त्याकाळात सातत्याने बालनाट्य करत. महाराष्ट्रभर दौरे करत असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या. बालनाट्य करणे कठीण पण काळाची गरज आहे. बालनाट्यात आपण उद्याचे चांगले प्रेक्षक घडवत असतो. नाटक कसे बघितले पाहिजे याचे प्रशिक्षण दिले जाते. चांगले प्रेक्षक बनतात. सभा धीटपणा येतो. त्यामुळे बालनाट्य शिबिरे घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तसेच माझी वाटचाल बाल रंगभूमी पासून झाल्यामुळे मला हा माहेरचा पुरस्कार मिळाला आहे असे वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले होते महेश कोठारे?
मुंबईतील बोरिवलीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारे यांनी थेट आगामी मुंबईचा महापौर भाजपचा आणि इथलाच असेल,असे वक्तव्य केलं. तसेच, मोदीभक्त आहे, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम आहे, महापालिका निवडणुकीत मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, अशी राजकीय फटकेबाजी कोठारेंनी केलीय.
महेश कोठारे ट्रोल
भाजप प्रेमामुळे महेश कोठारे यांना ट्रोल व्हावे लागले. विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी महेश कोठारेंवर टीकास्त्र डागलं आणि आरोपही केले. त्यानंतर, मराठी अभिनेत्री मेघा धाडेनं त्यांची बाजू घेतली आणि त्यांसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टही केली. मेघा धाडेच्या पोस्टवर शरद पोंक्षे यांनी कमेंट केली. शरद पोंक्षे म्हणाले की, “मीही मोदींचं कौतुक करतो, अमित शहांचं कौतुक करतो, जे जे चांगलं आहे, त्यांचं कौतुक करतो; सद्य परिस्थितीत भाजपशिवाय देशाला पर्याय नाही, असं माझं मत मी मांडलं. द्या किती शिव्या द्यायच्यात त्या…” शरद पोंक्षेंच्या कमेंटवर मेघा धाडेनं रिप्लाय केला आहे. तिनं म्हटलंय की, “मुळात आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक करण्यासाठी शिव्या खाव्या लागणं हे किती दुर्दैवी आहे… लोकांचं अज्ञान दुसरं काही नाही…”


