Zubair Hungergekar Pakistan link details : महाराष्ट्र एटीएसने पुण्यातील कोथरूड भागातून अटक केलेल्या संशयित दहशतवादी झुबेर इलियास हंगरगेकरच्या (वय ३७) मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाकिस्तानचा नंबर सापडल्याने तपास यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या व्यावसायिक सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या जुन्या आणि सध्याच्या हँडसेटमध्ये आखाती देशांसह पाकिस्तानी नंबर्स असल्याचे उघड झाले आहे.
त्याच्या लॅपटॉपमध्ये १ टीबीपेक्षा जास्त डेटा सापडला असून, त्यात अल कायदा या पाकिस्तान-आधारित दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयित माहिती आहे. दिल्लीतील स्फोटाशी याचे काही कनेक्शन आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. विशेष न्यायालयाने झुबेरला २८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
झुबेर हंगरगेकर हा सोलापूरचा रहिवासी असून, पुण्यातील कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत सॉफ्टवेअर टेस्टर आणि डेटाबेस डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे. तो पत्नी आणि दोन मुलांसोबत कोथरूडमध्ये राहतो. एटीएसने २७ ऑक्टोबरला त्याला अटक केली, जेव्हा तो चेन्नईतील सोशल फंक्शननंतर पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर उतरला होता. अटकेनंतर त्याच्या सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले.
एटीएसने सांगितले की, झुबेर अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार करत असून, तरुणांना भडकावण्याच्या प्रयत्नात होता. यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होत होता, असा आरोप आहे.
झुबेरच्या जुन्या हँडसेटमध्ये सापडलेल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एकूण ५ आंतरराष्ट्रीय नंबर्स आहेत. १ पाकिस्तानचा, २ सौदी अरेबियाचे, १ ओमानचा आणि १ कुवेतचा. तर सध्याच्या मोबाईलमध्ये १ ओमान आणि ४ सौदी अरेबियाचे नंबर्स सेव्ह आहेत. चौकशीत झुबेरने या नंबर्सबाबत “माहीत नाही” असे उत्तर दिले, यामुळे संशय अधिकच वाढला आहे. एटीएसने या नंबर्सचा मागोवा घेऊन जागतिक दहशतवादी नेटवर्कशी कनेक्शन तपासण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः पाकिस्तान-आधारित अल कायदाशी संबंधित असल्याचा संशय आहे.
लॅपटॉपमध्ये हादरवणारी माहिती
झुबेरच्या ताब्यातील लॅपटॉपमध्ये १ टीबीपेक्षा अधिक डेटा सापडला आहे. यात ओसामा बिन लादेन यांच्या भाषणांचे व्हिडीओ, बॉम्ब तयार करण्याच्या संशयित माहिती आणि तरुणांना भडकावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह फाइल्स असल्याचा संशय आहे. एटीएस फॉरेंसिक तज्ज्ञांकडून या डेटाची तपासणी करत असून, सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. ९ ऑक्टोबरला पुण्यातील अनेक ठिकाणी छाप्यांदरम्यान १९ लॅपटॉप आणि ४० मोबाईल्स जप्त करण्यात आले होते, ज्यातून व्यापक दहशतवादी नेटवर्कचा उलगडा होत आहे.


