Delhi Blast Update: जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती हल्ला मॉड्यूलमध्ये सहभागी असलेल्या अटक डॉक्टरांच्या चौकशीतून तपास यंत्रणांना धक्कादायक माहिती हात लागली आहे. आरोपींच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत ‘सिग्नल’ अॅपवरील एक गुप्त गट उघड झाला आहे. या गटाचा प्रशासक फरार मॉड्यूल नेता डॉ. मुझफ्फर होता, तर सदस्यांमध्ये डॉ. उमर, डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन यांचा समावेश होता.
चौकशीत समोर आले मोठे खुलासे
तपासात समोर आले की मॉड्यूलच्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये डॉ. उमर यांची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका होती. ते अमोनियम नायट्रेट, TATP (ट्रायएसीटोन ट्रायपेरोक्साइड) आणि इतर स्फोटक रसायने खरेदी करत असतं. प्रत्येक खरेदीची तपशीलवार माहिती प्रमाण, स्रोत, आणि रासायनिक मिश्रण कसे तयार करायचे ही सर्व माहिती ते सिग्नल गटावर शेअर करत असत. डिजिटल फूटप्रिंट्सनुसार, उमर हे अमोनियम नायट्रेट, TATP, सल्फर डायऑक्साइड, टायमर, वायर यांसारख्या बहुतेक साहित्याच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार होते.
डॉ. मुझम्मिल यांना स्फोटकांच्या सुरक्षित साठवणीची जबाबदारी देण्यात आली होती. जेव्हा जेव्हा स्फोटके त्यांच्या भाड्याच्या घरात हलवली जात, तेव्हा ते त्यांचे फोटो काढून गटात शेअर करत असत, ज्यामुळे साहित्य सुरक्षित असल्याची पुष्टी होत असे. तसेच, मॉड्यूलसाठी घेतलेल्या आय-20 कारची खरेदी माहितीही डॉ. उमर यांनी गटात दिली होती. तपासदरम्यान फैसल इशाक भट्ट नावाचा एक हँडलर समोर आला आहे, जो जैश-ए-मोहम्मदशी जोडलेला असल्याचा संशय आहे. आरोपींच्या म्हणण्यानुसार, दैनंदिन संकलन, चाचणी, तयारी आणि मॉड्यूलशी संबंधित सर्व माहिती डॉ. उमर थेट फैसलला पाठवत असत. तथापि, आरोपींना या हँडलरची खरी ओळख अद्याप माहित नाही.
नकली ओळखी आणि पाकिस्तान कनेक्शन
तपासात उघड झाले की हा हँडलर +966 कोड असलेल्या सौदी अरेबियातील व्हर्च्युअल नंबरचा वापर करत होता. एजन्सी त्याची ओळख शोधत आहेत. सुरुवातीच्या अंदाजानुसार, ‘फैसल इशाक भट्ट’ हेही टोपणनाव असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील जैश नेटवर्कने पाकिस्तानी दहशतवादी सहभाग लपवण्यासाठी काश्मिरी नाव वापरल्याचा संशय आहे.
चार पाकिस्तानी हँडलर्सची नावे उघड
तपासात जैश-ए-मोहम्मदच्या चार पाकिस्तानी हँडलर्सची नावे समोर आली आहेत: अबू उकाशा, हंजुल्लाह, निसार आणि फैसल इशाक भट्ट. तथाी, फरार नेता मुझफ्फर अफगाणिस्तानात गेल्यानंतर या नेटवर्कचे संपूर्ण ऑपरेशन हँडलर्सद्वारेच चालवले जात होते.


