Black Magic Case In Baramati: बारामतीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील घरापासून काहीच अंतरावर फुटपाथवर लिंबू आणि नारळ ठेवलेले आढळल्याने स्थानिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांना हा प्रकार दिसून आला. त्यातील काही सजग नागरिकांनी त्या वस्तू तत्काळ बाजूला काढून टाकल्या. मात्र नेमका हा प्रकार काय आहे. जादूटोणा, अंधश्रद्धा की अजून काही याबाबत परिसरात चर्चांना उधाण आलं आहे.
हा रस्ता बारामतीतील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असून, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काहीच अंतरावर अशी सामग्री आढळल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सकाळी मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या परिसरात जातात, त्यावेळी त्यांच्या नजरेस हे लिंबू–नारळ पडले. काही क्षणांतच या प्रकाराची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली. त्यामुळे हा सर्व प्रकार नेमका कोणी केला? हा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
पोलिसांकडे अद्याप या घटनेविषयी कोणतीही अधिकृत माहिती नसून, या प्रकाराबाबत कोणतीही तक्रार नोंदवली गेलेली नाही. तरीही, उपमुख्यमंत्र्यांच्या घराजवळ असा प्रकार घडल्याने सामान्य लोकांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत चर्चा सुरू झाल्या आहेत. स्थानिक रहिवाशांमध्येही याबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. घटनास्थळाच्या संवेदनशीलतेचा विचार करता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासावे, तसेच ही सामग्री तिथे कशी आली याचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


