मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मतभेद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिकच महत्त्वाची मानली जात आहे. मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत शिंदे गटातील एकही मंत्री सहभागी झाला नसला, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत संजय शिरसाट हेच एकमेव प्रतिनिधी होते. विशेष म्हणजे, शिवसेनेचे इतर मंत्री मंत्रालयात पोहोचले होते, परंतु त्यांनी बैठकीत सहभागी होण्याचे टाळले. बैठक संपल्यानंतर शिंदे गटातील सर्व मंत्री एकत्रितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांची तत्पर प्रतिक्रिया
शिवसेनेच्या नाराजीबद्दल विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्व मंत्री अनुपस्थित नव्हते, काही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आणि डोंबिवलीतील भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले, “उल्हासनगरमध्ये सुरुवात तुमच्याकडून झाली. तुम्ही करता तेव्हा ठीक, पण भाजपाने केलं तर गैर, असं होणार नाही. पुढे एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नका. हा नियम दोन्ही पक्षांना पाळावा लागेल.”
नाराजीचं मूळ कारण काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना भाजपाने शिंदे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेतल्याने शिंदे गटात नाराजी निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याने ही नाराजी आता खुलेआम दिसू लागली आहे.
महायुतीत दरी वाढतेय का?
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी – अशी तीन पक्षांची महायुती सत्तेत असली तरी गेल्या काही दिवसांत तणाव जाणवत आहे. आजच्या बैठकीवर बहिष्कारामुळे महायुतीत एकजूट आहे का? हा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर असताना जागावाटप, स्थानिक नेतृत्व, मतदारसंघातील स्पर्धा या मुद्द्यांवरून संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पुढील काही दिवसांत शिंदे गट आणि भाजप यांच्यातील दरी मिटते की वाढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


